उल्हासनगर गुन्हे अन्वेषणने केला पत्नीने प्रियकराच्या मदतीने 30 लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणल्याचा पर्दाफाश.
उल्हासनगर – पत्नीने प्रियकराच्या मदतीने 30 लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणल्याचा पर्दाफाश उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांनी केला आहे. पोलिसांनी दिल्लीतील निझामुद्दीन रेल्वे स्थानकावर सापळा रचून फिल्मी स्टाईलने सुपारीबाज आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून पत्नीला अंबरनाथच्या राहत्या फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले आहे. तर प्रियकर फरार झाला आहे.
अंबरनाथमध्ये पत्नी सुमन झा व मुलांसोबत राहणारा 46 वर्षीय रमेश झा हा येथील एका फार्मा कंपनीत काम करत होता. अशातच 25 फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास रमेश झा याचा मृतदेह अंबरनाथ-बदलापूर रोडवरील पेट्रोलपंप जवळ मिळून आला होता. त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.
या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर या गुन्ह्याचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला होता.
अखेर सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे दिल्लीत पळून जात असल्याचे उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजले. तेव्हा ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनावणे, पोलीस राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, चंद्रकांत पाटील यांनी 27 तारखेला दिल्ली गाठून निजामुद्दीन रेल्वे स्थानकात फिल्मी स्टाईलने सापळा रचून दीपककुमार शहा आणि संतोष गुप्ता यांच्या मुसक्या आवळल्या.
रमेश झा यांच्या हत्येत त्याची पत्नी सुमन झा हिचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावर 28 तारखेला सुमन झा हिला अंबरनाथ मधील राहत्या फ्लॅटमधून महिला पोलीस नाईक कुसुम शिंदे, महिला पोलीस शिपाई मनोरमा साळवे यांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणातील प्रियकर हा फरार असून त्याचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. पुढील तपासासाठी आरोपींना अंबरनाथ पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांनी दिली.
प्रतिनिधीपनवेल आणि नवी मुंबईच्या हद्दीतील डान्स बार, हॉटेल, लॉजिंग याठिकाणी वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असून या परिसरात अनैतिक प्रकारांना उधाण आल्याचे चित्र समोर दिसू...