ठाणे ग्रामीण मधील बार अँड रेस्टोरेंट मधील कामगारावर अनैसर्गिक अत्याचार,
ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय अंतर्गत कसारा पोलिस ठाणे हद्दीत खळबळजनक घटना घडली.बार अँड हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३७ वर्षीय कामगाराला तुझ्या मूळं दुसरा कामगार पळून गेल्याच्या संशयातून हॉटेल मालकासह एका कारागिराने त्या पीडित कामगाराला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील कसारा परिसरात असलेल्या एका बार अँड हॉटेलमध्ये घटना घडली आहे.कसारा पोलीस ठाण्यात कामगारासोबत अनैसर्गिक अत्याचारासह बेदम मारहाणीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी बारचा मालक आणि एका कारागिराला अटक केली आहे. निखिल हरी पिंगळे (वय ३५) असं अटक हॉटेल मालकाचं नाव आहे. तर मुफिज अस्लम पठाण (३२) असं अटक कारागीराचं नाव आहे. दोन्ही आरोपीची आज (4 मार्च) जेलमध्ये रवानगी केल्याचं सांगण्यात आलं.
पोलीस सूत्रानं दिलेल्या माहिती नुसार, ३७ वर्षीय पीडित कामगार हा विवाहित असून तो पत्नीपासून विभक्त राहतो. शहापूर तालुक्यातील एका गावात राहून मोखवाणे फाटा येथील सारंग बारमध्ये कामगार म्हणून काम करीत होता. पीडित या बारमध्ये काम करत असताना त्याच हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी एका कामगाराला पीडितने ५०० रुपयात मोबाईल विक्री केला होता. मात्र मोबाईलचे पैसे न देताच त्या कामगारानं हॉटेलमधून पळ काढला होता. दुसरीकडे पीडित कामगारामुळं आपला एक कामगार पळून गेल्याचा संशय आरोपी निखिल या हॉटेल मालकाला आला. याच कारणावरून २५ फेब्रुवारी रोजी बार बंद झाल्यानंतर पीडित कामगाराशी वाद घालत त्याला शिवीगाळ करून लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.
या कलमांनुसार गुन्हा दाखल : त्यानंतर आरोपी कारागीर मुफिज आणि आरोपी बार मालकानं पीडित कामगाराच्या अंगावरील कपडे काढून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित कामगारानं दोन्ही आरोपींच्या तावडीतून सुटका करीत हॉटेलच्या खिडकीतून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर त्यानं शेजारी एका हॉटेलमध्ये मित्राकडे जाऊन घडलेली घटना मित्राला सांगितली. घटना सांगितल्यानंतर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन २६ फेब्रुवारी रोजी उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळत पोलिसांनी सुरुवातीला पीडित कामगाराच्या जबानीवरून दोन्ही आरोपी विरोधात भादंवि कलम ३२४, ३२५ प्रमाणे सुरुवातीला गुन्हा दाखल केला.
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पीडित कामगाराला दाखल केले असता येथील डॉक्टरांनी तपासले. त्यावेळी अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय अहवाल प्राप्त करून सखोल चौकशी अंती वाढीव कलम ३७७ प्रमाणे दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता ४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानं दोन्ही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव यांनी दिली आहे.