क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल.
ग्राहकाने आणि त्याच्या दोन मित्रांनी थेट स्नॅक्स सेंटर मधील विक्रेत्याला मारहाण केली. स्नॅक्स सेंटरमध्ये त्यांनी तोडफोड केली, विक्रेत्याला काचेची बरणी फेकून मारली.
पुणे: प्रत्येकाला वडापाव गरमागरमच पाहिजे असतो. गरम वडापाव खाण्यात एक वेगळीच मजा असते. खाण्या-पिण्याचे शौकीन असलेल्यांना तर त्यांच्या मनाप्रमाणे खाद्यपदार्थ मिळाले नाहीत तर ते आकांततांडव करतात. अशीच एक घटना पुण्यातील बालेवाडी परिसरात घडली आहे. एका स्नॅक्स सेंटरमध्ये वडापाव विक्रेत्याने गार वडापाव दिल्याचं पाहून ग्राहकाचा पारा चढला. त्यानंतर ग्राहकाने आणि त्याच्या दोन मित्रांनी थेट स्नॅक्स सेंटर मधील विक्रेत्याला मारहाण केली. स्नॅक्स सेंटरमध्ये त्यांनी तोडफोड केली, विक्रेत्याला काचेची बरणी फेकून मारली.
नेमकं काय घडलं?
पुण्यात अगदी क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील बालेवाडी परिसरात वडापाव थंडगार असल्याने तिघांनी विक्रेत्याला काचेची बरणी फेकून मारत तोडफोड केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी (वय ४५, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश कोंडिबा ढेबे (वय २३) याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर देखील मारहाण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेलल्या माहितीनुसार, जोशी यांचे बालेवाडी परिसरातील साई चौकात शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. त्या ठिकाणी दुपारीच्या सुमारास अंकुश कोंडिबा ढेबे आणि त्याचे दोन मित्र स्नॅक्स सेंटरवर आले होते. त्यांनी वडापाव मागितला. वडापाव दिल्यानंतर तो गार आहे, यावरून वाद घातला. त्यानंतर आरोपींनी दुकानातील चहाचे थर्मास खाली फेकून तो फोडला. अंकुश कोंडिबा ढेबे याने काउंटरवरील काचेची बरणी हातात घेऊन ती प्रकाशचंद्र जोशी यांच्या दिशेने फेकून मारली. यामध्ये त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. बाणेर पोलिस तपास करत आहेत.